Manu Bhaker Wins Bronze Medal Paris Olympics 2024: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताने आज पहिले पदक जिंकले आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकत भारताला या ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून दिले. मनू भाकर ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी देशातील पहिली महिला नेमबाज ठरली आहे. मनू भाकरच्या या विजयानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत मनू भाकरचे अभिनंदन केले आहे. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु काय म्हणाल्या?


10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानं मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन...मनू भाकर नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. भारताला तुझ्यावर अभिमान आहे, असं द्रौपदी मुर्मु म्हणाल्या.






पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?


एक ऐतिहासिक पदक...मनू भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केली. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे खूप अभिनंदन. शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचे हे यश खूप खास आहे. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 






केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले?


मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन...असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.


मनू भाकरचे रौप्य पदक 0.1 गुणांनी हुकले


मनू भाकरने शनिवारीच महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पात्रता मिळवली होती. आज पदक स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये मनू भाकर सुरुवातीपासूनच टॉप 3 मध्ये होती. या स्पर्धेदरम्यान मनू भाकेरनेही अव्वल स्थान गाठले होते, पण शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचेपर्यंत ती दोन्ही कोरियन नेमबाजांपेक्षा मागे पडली आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मनू शेवटपर्यंत रौप्य पदकाच्या लढतीत होती. मनू भाकरचे रौप्य पदकाचे लक्ष्य 0.1 ने हुकले.


कांस्य पदक जिंकल्यानंतर काय म्हणाली?


मला खूप छान वाटतंय. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. कांस्य पदक जिंकले असले तरी मला आनंद आहे की मी देशासाठी जिंकू शकले. हे पदक सर्वांचं आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार असं मनू भाकर म्हणाली. कांस्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले की, तिने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. मनू भाकर 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.


संबंधित बातमी:


Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचा 'कांस्य'वेध; विजयानंतर म्हणाली, 'कृष्णाने अर्जुनाला केवळ...'