Tokyo Olympic : भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. यासह भारताचा वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले. सोशल मीडियावरही लोक मीराबाई चानूचे जोरदार अभिनंदन करत आहेत. या मोठ्या विजयानंतर मीराबाई चानूने मुलाखतीत पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची इच्छा ऐकून डॉमिनोजने (Dominos Pizza) तिला लाइफटाईम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे.
डॉमिनोने ट्वीट केले आहे, "मीराबाई चानूने म्हटलं आणि आम्ही ते ऐकलं. मीराबाई चानूने पिझ्झा खाण्याची वाट पाहू नये अशी आमची इच्छा नाही. म्हणूनच आम्ही तिला आजीवन मोफत डॉमिनोज पिझ्झा देत आहोत." कंपनीने तत्परतेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी सोशल मीडियावरील लोक डॉमिनोजचे आभार मानत आहेत. मीराबाईच्या आधी 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कर्णम मल्लेश्वरीने देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. 21 वर्षांनंतर आता मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकून देशाचे नाव मोठं केलं आहे.
मीराबाई चानूने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय की, "काल मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय"
मीराबाई चानूनं आपल्या यशाचं सर्व श्रेय देशवासियांना दिलं. मीराबाई चानूनं पुढे बोलताना म्हटलं की, "सर्व देशवासियांमुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढं मोठ यश मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते"