Why Bajrang Punia Ban by NADA for 4 years : कुस्तीपटू बजरंग पुनिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्यावर डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर बंदी घातली आहे.


भारताचा टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याला नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड टेस्ट दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यात नकार दिल्याने चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. NADA ने सुरुवातीला 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला त्याच गुन्ह्यासाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर त्याला जागतिक प्रशासकीय मंडळ, UWW ने निलंबित केले होते. या निलंबनाचा अर्थ असा आहे की त्याला स्पर्धात्मक कुस्तीमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.


बजरंगने निलंबनाला केला विरोध


बजरंगने सुरुवातीला निलंबनाचा निषेध केला होता, त्यानंतर 31 मे रोजी, NADA च्या डोपिंग विरोधी पॅनेलने (ADDP) आरोपांची औपचारिक नोटीस जारी होईपर्यंत तात्पुरते निलंबन मागे घेतले. मात्र, पुन्हा 23 जून रोजी नाडाने त्याला या आरोपांची औपचारिक माहिती दिली. परंतु पुनियाने आरोपांविरुद्ध 11 जुलै रोजी अपील दाखल केले, त्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.




बजरंग पुनियाने राजकारणात मारली एन्ट्री


कुस्तीपटू बजरंग पुनियाने ऑक्टोबर महिन्यात किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी त्याने कुस्तीपटू विनेश फोगटसोबत राजकीय मैदानात उतरून काँग्रेसशी हातमिळवणी केली होती.


कोण आहे कुस्तीपटू बजरंग पुनिया?


गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असतानाही बजरंग पुनियाने टोकियो येथे झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशाचा गौरव केला. हरियाणातील झज्जर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या बजरंगचे वडील बलवान सिंग हे स्वतः कुस्तीपटू होते.  


भारतीय कुस्तीपटूने वयाच्या 14 व्या वर्षी स्थानिक आखाड्यात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि लवकरच ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त यांच्याशी ओळख झाली. योगेश्वर दत्तच्या देखरेखीखाली बजरंगने कुस्तीशी संबंधित अनेक बारकावे शिकले जे नंतर त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरले. बजरंग पुनिया 2013 मध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 60 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून प्रथम प्रकाशझोतात आला.