पॅरिस : भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) मनू भाकरनं कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर भारताच्या नजरा आणखी एका पदकाकडे लागल्या होत्या. 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात अर्जुन बबुतानं (Arjun Babuta) अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आज अर्जुन बबुतानं 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, अर्जुन बबुता चौथ्या स्थानी राहिल्यानं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. 


अर्जुन बबुतानं पात्रता फेरीत 630.1 गुण मिळवत अंतिम फेरीत पोहोचला होता. अर्जुन बबुता सातव्या स्थानावर असल्यानं त्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. 


अर्जुन बबुता हा मूळचा चंदीगडचा असून भारतीय संघाचा तो 2016  पासून सदस्य आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर अर्जुन बबुतानं ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता.  अर्जुन बबुता हा पंजाबच्या जलालाबाद येथील गावातून येतो. अर्जुन बबुताचं गाव भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. अर्जुनचं कुटुंब वडिलांच्या कामानिमित्त चंदीगडमध्ये पोहोचलं. अर्जुननं बीएचं शिक्षण डीएव्ही कॉलेजमधून केलं होतं. 


नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्रा यांच्या सल्ल्यानुसार कर्नल जे.एस. धिल्लोन यांनी अर्जुनला मार्गदर्शन केलं. अर्जुन बबुता त्यानंतर एअर रायफल शुटिंगकडे वळला.  अर्जुननं 2013 मध्ये चंदीगड राज्य शुटिंग स्पर्धा जिंकली होती. 


बॅडमिंटन महिला दुहेरीमध्ये भारताच्या  अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रास्तो यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या जोडीला जपानच्या नामी मतसुयामा आणि चिहारा शिदा यांनी 21-11 आणि 21-12 नं पराभूत केलं. 


मनू भाकर भारताला दुसरं पदक मिळवून देणार?


मनू भाकरनं भारताला 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं होतं. मिश्र दुहेरी 10 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात उद्या  मनू भाकर आणि सरबजीत यांना कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.   याशिवाय 25 मीटर पिस्टल क्रीडा प्रकारात मनू भाकर 2 ऑगस्टला सहभागी होणार आहे. मनू भाकर आणि सरबजीत यांनी पदक जिंकल्यास एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकवून देणारी पहिली खेळाडू ठरु शकते.


दरम्यान, थोड्याच वेळात भारत आणि अर्जेंटिना यांच्यात हॉकीची मॅच होणार आहे. भारतानं पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. आज भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी होतो का ते पाहावं लागणार आहे. 


संबंधित बातम्या :



 

Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा