Vinesh Phogat Mahaveer Phogat: कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसने (सीएएस) भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या (Vinesh Phogat) याचिकेवरील निर्णय मंगळवारी लांबणीवर टाकला. आता यावर 16 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी फैसला होणार आहे. विनेशच्या याचिकेवर आधी ऑलिम्पिक संपण्याआधी अर्थात 11 ऑगस्टपूर्वी निर्णय होणार होता. नंतर तो 13 ऑगस्टला होईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र मंगळवारी हा निर्णय आणखी लांबणीवर गेला.


विनेश फोगट खटल्याच्या निकालाची तारीख पुन्हा एकदा 16 ऑगस्टपर्यंत वाढवल्यानंतर तिचे काका महावीर फोगाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या निर्णय पुन्हा पुढे ढकलल्याने महावीर फोगाट संतापल्याचे दिसून आले.  महावीर फोगाट म्हणाले की, आम्ही 5-6 दिवसांपासून निर्णयाची वाट पाहत आहोत. पण तारीख पे तारीख दिली जात आहे. तरीही आम्ही निकालीची वाट पाहू आणि आमच्यासह संपूर्ण भारत विनेशच्या निर्णयाची वाट बघत आहे. 


आम्ही फटाके फोडण्यास तयार होतो-


विनेशचा आज निर्णय येईल असं वाटलं होतं. त्यामुळे आम्ही मिठाई वाटण्यासाठी आणि फटाके फोडण्यासाठी तयार होतो. परंतु निकाल पुढे ढकलण्यात आला. हा निकाल विनेशच्या बाजूने लागेल, याबाबत आम्हाला विश्वास आहे. सीएएस जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. 


नेमकं प्रकरण काय?


दरम्यान विनेश फोगाट ही 53 किलो वजनी गटातून कुस्ती खेळते मात्र, पॅरिस ऑलिम्पिकसाठी या वजनी गटातून अमित पंघाल पात्र ठरली होती. यामुळं विनेश फोगाटनं 50 किलो वजनी गटातून फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सहभाग घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटनं एकाच दिवसात तीन सामने खेळले होते. यानंतर तिनं वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी करण्यात आलेल्या वजनाच्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन अधिक आढळलं अन् तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. यानंतर विनेश फोगाटनं  सीएएस मध्ये धाव घेतली होती. 


विनेश फोगाटच्या वकिलानं दिले मोठे संकेत


विनेश फोगाटचे वकील सिंघानिया म्हणाले की न्यायमूर्ती या प्रकरणात गांभीर्यपर्वक अधिक विचार करत असतील तर ते आमच्यासाठी चांगलं आहे. विदुष्पत सिंघानिया यांनी म्हटलं की ते यापूर्वी देखील CAS मध्ये केस लढले आहेत. मात्र, इथं प्रकरणामध्ये विजय मिळवण्याची शक्यता कमी असते. विनेश फोगाटच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा आहे. हे थोडं कठीण वाटत आहे मात्र सर्वजण ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा करतोय, असं सिंघानिया म्हणाले. विनेश फोगाटला पदक मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे. याशिवाय जरी पदक नाही मिळालं तरी विनेश फोगाट चॅम्पियन खेळाडू आहे, असं सिंघानिया म्हणाले.  


संबंधित बातमी:


Video: मनू भाकर अन् नीरज चोप्राचं लग्न?; व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस