रोहतक : कुस्तीमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पैलवान साक्षी मलिक रविवारी लग्नाच्या बेडीत अडकली. साक्षीने मित्र आणि कुस्तीपटू सत्यव्रत कादियानसोबत संसार थाटला.

हरियाणातील रोहतकजवळील बोहर या गावात पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर अनेक खेळाडूंनी तसंच कलाकारांनी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला. तर चाहत्यांनी फेसबुक तसंच ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या.

2016च्या रिओ ओलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या साक्षी मलिकचा मागील वर्षी सत्यव्रत कादियानसोबत साखरपुडा झाला होता. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी साक्षी ही भारताची पहिलीच महिला पैलवान आहे.

साक्षीचा पती सत्यव्रतही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवान आहे. सत्यव्रत कादियानने 2010 च्या यूथ ऑलम्पिकमध्ये कांस्य तर 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली होती. शिवाय सत्यव्रतने ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपचं कांस्य पदक पटकावलं होतं.