लिमा (पेरु) : 2024 आणि 2028 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी यजमान शहरांची निवड करण्यात आली आहे. 2024 साठी पॅरिस, तर 2028 साठी लॉस एंजेलिसच्या नावावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं शिक्कामोर्तब केलं.

लागोपाठ दोन ऑलिम्पिकची यजमान शहरं एकाचवेळी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ होती. पेरुची राजधानी लिमामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याआधी पॅरिसमध्ये 1924 साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर नेमक्या शंभर वर्षांनी फ्रान्सच्या राजधानीत पुन्हा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात येईल.

लॉस एंजेलिसमध्ये याआधी 1932 आणि 1984 साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे 2028 साली लॉस एंजेलिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात येईल.

2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधील टोकियो शहरात घेतल्या जाणार आहेत.