दोन डझन सामन्यात शेवटच्या बॉलवर धोनीचे सिक्स!
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2017 11:58 AM (IST)
कटकच्या बाराबती स्टेडयममधील सामन्यात धोनीने डावाच्या अखेरच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर शानदार षटकार ठोकला.
कटक (ओदिशा) : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बुधवारी (20 डिसेंबर) भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. ट्वेण्टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात धोनीच्या फलंदाजीने त्याला पुन्हा शिखरावर पोहोचवलं. चौथ्या क्रमांकावर उतरुन 35 वर्षीय धोनीने केवळ एक बाजू लढवली नाही, तर 22 चेंडूत 39 धावांची खेळी रचत श्रीलंकेला 181 धावांचं आव्हानही दिलं. कटकच्या बाराबती स्टेडयममधील सामन्यात धोनीने डावाच्या अखेरच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर शानदार षटकार ठोकला. श्रीलंकन कर्णधार थिसारा परेराच्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर धोनी धावत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी संपूर्ण स्टेडियमध्ये 'धोनी-धोनी'चा घोष सुरु होता. - आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचं झाल्यास, धोनीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 24 वेळा षटकार ठोकत डाव 'फिनिश' केला आहे. यापैकी 22 सामन्यात भारताचा विजय झाला आहे. 13 वेळा वन डे सामन्यात (9 वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना) 8 वेळा ट्वेण्टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात (3 वेळा आव्हानाचा पाठलाग करताना) 3 वेळा कसोटी सामन्यात (1 वेळा आव्हानाचा पाठलाग करताना) - धोनीने ट्वेण्टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा षटकार लगावले आहेत. 5 वेळा - एमएस धोनी (भारत) 2 वेळा - अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) 2 वेळा - मशरफे मुर्तजा (बांगलादेश) 2 वेळा - शफीउल्लाह (अफगाणिस्तान) 2 वेळा - नॅथन मॅक्युलम (न्यूझीलंड) - टी-20 मध्ये धोनीचे सर्वाधिक डिसमिसल महेंद्र सिंह धोनीने टी-20 सामन्यात एखाद्या विकेटकीपर किंवा क्षेत्ररक्षकापेक्षा जास्त खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम बनवला आहे. कटकमधील सामन्यात धोनीने चार फलंदाजांचा झेल टिपला आणि यष्टीचित केलं. अशाप्रकारे त्याच्या डिसमिसल्सची संख्या आता 74 झाली आहे, यात 47 झेल आणि 27 स्टम्पिंगचा समावेश आहे. - श्रीलंकेचा 87 धावांत खुर्दा, भारताचा दणदणीत विजय यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या ट्वेण्टी20 सामन्यात 93 धावांनी मात केली. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेचा डाव अवघ्या 87 धावात आटोपला.