मुंबई : फुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या सामन्यातही बेशिस्त खेळाडूला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबरपासून हा नियम लागू केला जाणार आहे.
क्रिकेटच्या नियमांमध्ये नुकतीच सुधारणा करण्यात आली असून, एक ऑक्टोबर 2017 पासून सुधारित नियम लागू होतील अशी माहिती एमसीसी म्हणजे मेरीलबोन क्रिकेट क्लबनं दिली आहे.
एमसीसीच्या क्रिकेट समितीची बैठक डिसेंबर महिन्यात मुंबईत पार पडली. याच बैठकीत सुधारित नियमांची शिफारस करण्यात आली होती.
क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्त वर्तनाला आळा घालण्याची वेळ आली असल्याची कबुली एमसीसीच्या क्रिकेट समितीचे मुख्य जॉन स्टीफनसन यांनी दिली.
स्थानिक पातळीवर खेळाडूंच्या वाढत्या बेशिस्तीला कंटाळून अनेक पंच खेळापासून दूर जात आहेत, असं स्टीफनसन यांनी सांगितलं. त्यामुळं क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्त वर्तनाला आळा घालण्यासाठी रेड कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.