मुंबई: नियमबाह्य घर खरेदी प्रकरणातील शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वरांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. ‘ज्या घरात मी राहतो ते घर गजानन पंडित यांचं आहे. तेथे भाडेतत्वावर राहत असल्याचं स्पष्टीकरण महाडेश्वरांनी एबीपी माझाशी बोलतांना दिलं होतं. मात्र, त्या घराचे मालक गजानन पंडीत यांनी महाडेश्वरांचे हे विधान खोटे असल्याचं सांगितलं आहे.
‘महाडेश्वरांनी हे घर माझ्या पत्नीच्या आजारपणात पावणेचार लाख रुपयांच्या मोबदल्यात बळकावलं.’ असा आरोप पंडित यांनी केला आहे. ‘शिवाय, ते जर भाडेकरू म्हणून माझ्या घरात राहत असतील तर असा पुरावा महाडेश्वरानी दाखवावा.’ असं गजानन पंडितांनी आव्हान दिलं आहे.
विश्वनाथ महाडेश्वर राहत असलेल्या साईप्रसाद गृहनिर्माण संस्था या इमारतीतील राहते घरच नियमबाह्य रितीनं विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण:
ज्या वॉर्डमधून विश्वनाथ महाडेश्वर निवडून आले आहेत, त्याच वॉर्ड क्र. 87 चे अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी हा आरोप केला आहे.
विश्वनाथ महाडेश्वर यांनी नियमांचा भंग करुन महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील सदनिका विकत घेतली असल्याचा आरोप महेंद्र पवार यांनी केला आहे.
अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण लघूवाद न्यायालयात दाखल करण्यास सांगितले असून, तिथे येत्या 23 तारखेला सुनावणीस होणार आहे. किमान तोपर्यंत तरी महाडेश्वरांना महापौर बनवू नये, अशी महेंद्र पवार यांची मागणी आहे.
विश्वनाथ महाडेश्वर यांचं स्पष्टीकरण
नियमांचं भंग केल्याचा आरोप चुकीचा आहे. निवडणूक आयोगाला शपथपत्रात याबाबत सर्व माहिती दिली आहे, असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं आहे. शिवाय, “मी आता ज्या घरात राहतो आहे, ते घर माझं स्वत:चं नाही. शपथपत्रात तसं स्पष्ट लिहिलं आहे. गजानन पंडित यांच्या नावे हे घर असून, मी भाड्याने इथे राहत आहे आणि तसा मूळ मालकाशी करारही केला आहे.”, असेही विश्वनाथ महाडेश्वर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं.
संबंधित बातम्या:
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत!