गडचिरोली : नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. प्रा. साईबाबा, जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा आणि प्रशांत राही यांच्यासह पाच आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली असून सहाव्या आरोपीला दहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे.

जी. एन. साईबाबा हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अटक झाली त्यावेळी साईबाबा यांच्याकडे नक्षलींशी संबंधित साहित्य आढळलं होतं. गडचिरोली पोलिसांनी दिल्लीतून साईबाबांना अटक केली होती. कथित माओवादी हेम मिश्रा यालाही गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती.

साईबाबा यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला दररोज चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

रोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या आदेशांनंतर खटल्याला वेग आला. मात्र सुनावणी दरम्यान गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं.