DRS प्रकरणी विराट, स्मिथवर कारवाई नाही : आयसीसी
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2017 10:39 PM (IST)
नवी दिल्ली : बंगळुरु कसोटीतील डीआरएस वादाप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं स्पष्टीकरण आयसीसीने दिलं आहे. आयसीसीने या सामन्यातील दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर दोन्हीही संघाच्या कर्णधारांवर कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच उभय संघाच्या कर्णधारांवर कोणत्याही प्रकारच्या दंडाची कारवाई होणार नसल्याचंही आयसीसीने म्हटलं आहे. बंगळुरु कसोटीत दोन्हीही संघाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आता रांचीत खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीवर उभय संघांनी लक्ष केंद्रित करावं. या सामन्यापूर्वी पंच आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये बैठक होईल, ज्यामध्ये आपापल्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली जाईल, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिली. काय आहे प्रकरण? बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं, त्या वेळी स्मिथने डीआरएसचा कौल मागण्यासाठी ड्रेसिंगरूममधल्या आपल्या सहकाऱ्यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याविरोधात पंचाकंडे तक्रार केली. त्यामुळे उभय कर्णधारांमध्ये वादाची ठिणगी पडली. बंगळुरू कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने स्मिथच्या त्या कृतीवर जाहीर टीका केली. संबंधित बातम्या :