डीआरएस वाद , बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलियात वादाची ठिणगी
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2017 08:34 PM (IST)
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथमध्ये बंगळुरू कसोटीत भर मैदानात झालेल्या शाब्दिक चकमकीने बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्येही वादाची नवी ठिणगी टाकली आहे. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं, त्या वेळी स्मिथने डीआरएसचा कौल मागण्यासाठी ड्रेसिंग रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याविरोधात पंचाकंडे तक्रार केली. त्यामुळे उभय कर्णधारांमध्ये वादाची ठिणगी पडली. बंगळुरू कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने स्मिथच्या त्या कृतीवर जाहीर टीका केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्मिथचं समर्थन बंगळुरू कसोटीत डीआरएसचा कौल घेण्याआधी ड्रेसिंग रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पाठराखण केली आहे. स्टीव्ह स्मिथच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणं अपमानास्पद असून, डीआरएसच्या निर्णयासाठी ड्रेसिंगरूममधल्या सहकाऱ्यांकडून मदत मागण्यामागे त्याचा कोणताही गैर हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सुदरलँड यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.