वेलिंग्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंड क्रिकेट संघ 2003 नंतर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. न्यूझीलंड क्रिकेट एक टी-20 सामना खेळण्यासाठी पाकिस्तानच्या निमंत्रणावर सध्या विचार करत आहे. जर न्यूझीलंडने या दौऱ्याला मान्यता दिली तर तब्बल 15 वर्षानंतर त्यांचा पाकिस्तान दौरा असणार आहे.


कराचीमध्ये 2002 साली न्यूझीलंड संघाच्या हॉटेलवर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता.

'सध्या न्यूझीलंड क्रिकेट पाकिस्तानकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करत आहे. तसंच सुरक्षा एजन्सी, सरकार आणि खेळाडूंशी विचार विनिमय सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही पीसीबी उत्तर देऊ.' अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.

पीसीबीने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना पाकिस्तानमध्ये टी-20 सामना खेळण्यासाठी आग्रह धरला आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच नकार दिल्याने आता पीसीबीचं न्यूझीलंड लक्ष लागून राहिलं आहे.

'आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. आम्ही सध्या तरी पाकिस्तानमध्ये खेळण्याचा विचार करु शकत नाही.' असं उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिलं आहे.

दरम्यान, लाहोरमध्ये 2009 साली श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही.