बे ओव्हल : कॉलिन मुन्रोने ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक झळकावून नवा इतिहास घडवला. त्याच्या या शतकाने न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 119 धावांनी दणदणीत विजयही मिळवून दिला.

ट्वेंन्टी ट्वेंन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरं शतक झळकावणारा मुन्रो हा पहिला फलंदाज ठरला. त्याने अवघ्या 53 चेंडूंत 104 धावांची खेळी उभारली. त्यामुळेच न्यूझीलंडला वीस षटकांत पाच बाद 243 धावांची मजल मारता आली. त्यानंतर न्यूझीलंडने विंडीजला सतराव्या षटकात नऊ बाद 124 असं रोखलं.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस, ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी दोन शतकं आहेत. मात्र तीन शतकं ठोकणारा कॉलिन मुन्रो हा पहिलाच फलंदाज बनला. रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वादळी शतक पूर्ण केलं होतं.

मन्रोशिवाय मार्टिन गप्टिलनेही 63 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.