सिडनी : ''इंग्लंडकडून खेळण्याचा कधीही विचार केला नव्हता, मात्र सुरुवातीच्या काळात सरेकडून चांगली ऑफर आली होती'', असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने म्हटलं आहे. आपण काऊंटी क्रिकेटचा चाहता असल्याचंही त्याने सांगितलं. शिवाय भविष्यात काऊंटी क्रिकेट खेळण्याचे संकेतही दिले.


स्मिथने 2007 साली केंटकडून समरच्या क्लब क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता.

ईएसपीएनक्रिकइंफोने स्मिथच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे. ''सरेकडून ऑफर आली होती, ते चांगले पैसेही देण्यासाठी तयार होते. मात्र साऊथ वेल्समध्ये पुनरागमन करुन ऑस्ट्रेलियासाठी खेळेन, याचा विश्वास होता'', असं स्मिथ म्हणाला.

''तो एक असा निर्णय होता, जो मला घ्यायचाच होता. इंग्लंकडून खेळण्याचा कधीही विचार केला नव्हता. नेहमीच ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची इच्छा होती'', असं स्मिथने सांगितलं.

स्मिथची आई ब्रिटनची आहे आणि त्यामुळेच तो नॉन ओव्हरसीज खेळाडू म्हणून खेळू शकत होता. स्मिथला क्लब क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव देणारा केंट हा पहिलाच संघ होता. मात्र आपली इंग्लंडकडून खेळण्याची इच्छा नसल्याचं त्याने पहिल्या सामन्यानंतरच स्पष्ट केलं होतं.