आयपीएलमध्ये नेपाळच्या 17 वर्षीय क्रिकेटरला संधी
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2018 03:57 PM (IST)
संदीप लामिछेन हा आयपीएलच्या लिलावात बोली लागलेला नेपाळचा पहिला क्रिकेटर ठरला आहे. आयपीएलच्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सनं संदीप लामिछेनवर यशस्वी बोली लावली आहे.
मुंबई : संदीप लामिछेन हा आयपीएलच्या लिलावात बोली लागलेला नेपाळचा पहिला क्रिकेटर ठरला आहे. आयपीएलच्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सनं संदीप लामिछेनवर यशस्वी बोली लावली आहे. दिल्लीला संदीपला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे वीस लाखांत विकत घेतलं. सतरा वर्षांचा संदीप लामिछेन हा लेग स्पिनर आहे. न्यूझीलंडमधल्या अंडर-19 विश्वचषकात त्यानं लक्षवेधक कामगिरी बजावली होती. संदीपने सहा महिन्यात 17च्या सरासरीने 14 बळी घेतले होते. तसेच या मालिकेतील सर्वात जास्त बळी घेणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा देखील संदीपच्या कामगिरीनं प्रभावित झाला होता. त्यामुळे त्याने हाँगकाँग टी-20 ब्लिट्जमध्ये कोउलून कांटून्सकडून खेळण्यासाठी त्याची निवड केली होती. सायंग्जा जन्मलेल्या संदीपचे वडील भारतीय रेल्वेत कार्यरत होते. संदीप जवळजवळ दोन ते तीन वर्ष भारतातच वास्तव्यास होता.