हरारे : नेपाळने इतिहासात पहिल्यांदाच वन डे क्रिकेट संघाचा दर्जा मिळवला आहे. विश्वचषक पात्रता फेरीत नेपाळने पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) सहा विकेट्सने पराभव करत हा मान मिळवला. हा सामना झिम्बाब्वेच्या हरारे स्टेडिअमवर खेळवण्यात आला.

संदिप लमिचाने आणि दिपेंद्र ऐरीच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर नेपाळने पीएनजीचा डाव अवघ्या 114 धावांत गुंडाळला. या दोघांनी प्रत्येकी चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर नेपाळने हे लक्ष्य 27 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

या पराभवामुळे पीएनजीला मात्र वन डे क्रिकेटचा दर्जा गमवावा लागला. पीएनजीची फलंदाजी अत्यंत ढासळलेली पाहायला मिळाली. पीएनजी संघ टूर्नामेंटमधील पाचपैकी चार सामन्यांमध्ये 200 किंवा त्यापेक्षा कमी धावांत गुंडाळला गेला.

नेपाळचा कर्णधार पारस खडकासने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 17 वर्षीय लेग स्पिनर लामिचाने 29 धावा देत चार आणि ऐरीने 14 धावा देऊन चार फलंदाजांना माघारी धाडलं. नेपाळच्या फिरकीपटूंनी पीएनजीला अवघ्या 144 धावात बाद केलं.

त्यानंतर ऐरीने फलंदाजीमध्येही शानदार कामगिरी केली. ज्यामध्ये त्याने 58 चेंडूत 50 धावांची खेळी केली. आरिफ शेखनेही 26 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यामुळे नेपाळने 27 षटकांमध्येच हा सामना जिंकला.

नेपाळ आता सातव्या स्थानासाठी प्ले ऑफमध्ये नेदरलँडशी भिडणार आहे. तर पीएनजीचा सामना नवव्या क्रमांकासाठी हाँगकाँगशी होईल.