नागपूर: जसप्रीत बुमरा आणि आशिष नेहरा यांच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियानं कालच्या नागपूरमधील टी-20 सामन्यात इंग्लंडवर थरारक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतानं 5 धावांनी इंग्लंडला पराभूत करुन मालिकेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज 144 धावांपर्यंत मजल मारु शकले. पण भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि इंग्लिश फलंदाजाना 139 धावांमध्येच रोखलं. या सामन्याचे खरे हिरो ठरले ते नेहरा आणि बुमरा. या जोडगोळीनं भारताचा विजय अक्षरश: खेचून आणला.
144 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच नेहरानं एकाच षटकात दोन धक्के दिले. या सामन्याचं पारडं दोन्ही संघाकडं झुकत होतं. पण ऐन मोक्याच्या वेळी बुमरानं अचूक मारा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दरम्यान यावेळी बुमराला नेहराचंही अचूक मार्गदर्शन लाभलं.
इंग्लंडला विजयसाठी शेवटच्या षटकात 8 धावा आवश्यक होत्या. मात्र, बुमरानं अवघ्या दोन धावा दिल्या. तसंच याच षटकात बुमरानं दोन विकेटही घेतल्या. शेवटच्या षटकात बुमरानं पहिल्या पाच चेंडूत फक्त दोन धावा दिल्या. या प्रत्येक 5 चेंडूत बुमरानं नेहरा आणि कर्णधार कोहलीचा सल्ला घेऊन गोलंदाजी केली.
शेवटच्या चेंडूत इंग्लंडला 6 धावा आवश्यक होत्या. म्हणजे विजयासाठी षटकार ठोकणं अपरिहार्य होतं. समोर फलंदाज होता मोईन अली. त्या एका चेंडूत टीम इंडियाचा निकाल लागणार होता. बुमरावरही बराच दबाव होता. त्याचवेळी नेहरानं जवळ येऊन बुमराला मोलाचा सल्ला दिला. 'मी शेवटचा बॉल आखूड टप्प्याचा टाकतो.' असं बुमरानं नेहराला सांगितलं. पण त्याचवेळी नेहरानं आपल्या अनुभवच्या जोरावर बुमराला सांगितलं की, 'असं अजिबात करु नको. आखूड टप्प्याच्या चेंडूवर सिक्स जाण्याची जास्त शक्यता आहे. एकतर तू यॉर्कर टाक किंवा आऊट साईड दी ऑफ स्टंप लोवर फुलटॉस दे. या चेंडूवर जास्तीत जास्त चौकार बसू शकतो. पण आपण सामना गमावणार नाही.'
अखेर बुमरानंही नेहराचा सल्ला ऐकला आणि शेवटच्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लोअर फुलटॉस टाकला. मोईन अलीला बुमरा नेमका कोणता चेंडू टाकेल याचा अंदाज आला नाही आणि त्या चेंडूवर त्याला एकही धाव घेता आली नाही. भारतानं हा सामना 5 धावांनी खिशात घातला.