Neeraj Chopra: भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) मध्ये सुवर्ण कामगिरी करत पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णमय कामगिरी करणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला. नीरजनं 88.17 मीटरचा बेस्ट थ्रो करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. तर रौप्य पदक पाकिस्तानच्या अरशद नदीमनं पटकावलं. अरशदनं 87.82 मीटरचा बेस्ट थ्रो करत रौप्य पदक आपल्या नावे केलं. 


नीरजनं सुवर्णकामगिरी केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच नीरजच्या वडिलांनीही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. इंडिया टुडेशी बोलताना सतीश कुमार म्हणाले की, "आम्हाला पूर्ण विश्वास होता की, नीरज गोल्ड मेडल पटकावणारच. नीरजचाही विश्वास होता की, तो गोल्ड मेडल पटकावेलच. त्याला माहिती होतं की, तो देशाचं नाव उंचावेल. हा संपूर्ण देशासाठी आनंदाचा दिवस आहे. वर्ल्ड चॅम्पियशनशिपमध्येही आपल्याला गोल्ड मेडल मिळालं आहे." नीरजच्या सुवर्णकामगिरीनंतर त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या. पण सध्या चर्चेत आहे ती, नीरजच्या आईनं पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमवर नीरजच्या आईनं दिलेली प्रतिक्रिया... 


अरशद नदीमबाबत काय म्हणाले नीरजचे आई-वडिल? 


पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीमनं रौप्य पदक पटकावलं त्याबाबतही त्यांनी आनंद व्यक्त केला. नीरजच्या वडिलांनी बोलताना सांगितलं की, "नीरज आणि अरशद नदीम दोन्ही खेळाडूंचं आपापसांत खूप चांगलं जमतं. यापूर्वीच्या अनेक सामन्यांमध्ये दोघांनीही उत्तम कामगिरी केली आहे. माझं म्हणणं आहे की, यामुळे आशियाकडे दोन पदकं आलीत, त्यामुळे संपूर्ण आशियाई देशांसाठी ही गर्वाची बाब आहे."






"स्पर्धेत पाकिस्तनाच्या खेळाडूंचा समावेश असला तरीही..."


उपस्थित असलेल्या एका माध्यम प्रतिनिधींनी नीरजच्या आईला प्रश्न विचारला. नीरजनं एका पाकिस्तानी खेळाडूचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं, तुम्हाला कसं वाटतंय? यावर क्षणाचाही विलंब न लावता नीरजच्या आईनं स्पष्ट म्हटलं की, "हे बघा मैदानात उतरल्यावर अनेक खेळाडू असतात. सर्वच खेळण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी ना कोणी जिंकरणाच. त्यांच्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश असला तरीही काहीच गैर नाही. खरंच आनंदाची गोष्ट आहे की, तो पाकिस्तानी खेळाडूही जिंकला आहे."


दरम्यान, वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रानं फाऊलनं सुरुवात केली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं थेट 88.17 मीटर अंतरावर भालाफेक केली. आणि यासह प्रथम क्रमांक मिळवला. नीरजनं तिसऱ्या थ्रोमध्ये 86.32 मीटर, चौथ्या थ्रोमध्ये 84.64 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.73 मीटर आणि शेवटच्या प्रयत्नात 83.98 मीटर भालाफेक केली. त्याचवेळी, पाकिस्तानच्या अरशद नदीमनं तिसऱ्या प्रयत्नात 87.82 मीटरची सर्वोत्तम थ्रो केली. या प्रकारात किशोर जेना पाचव्या तर डीपी मनू सहाव्या स्थानावर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


विदेशी चाहतीनं तिरंग्यावर मागितला 'ऑटोग्राफ'; त्यानंतर गोल्डन बॉयनं जे काही केलं, ते पाहून तुम्हीही म्हणाल, "नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे!"