Neeraj Chopra In Diamond League: नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. नीरज चोप्राने शेवटच्या थ्रोमध्ये 89.49 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिला क्रमांक पटकावला असून त्याने शेवटच्या थ्रोमध्ये 90.61 मीटर अंतर कापले.


नीरज चोप्रा (Neeraj Chopra) पहिल्या प्रयत्नात केवळ 82.10 मीटर भालाफेक करू शकला. दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने अधिक चांगले अंतर कापले आणि 83.21 मीटर अंतरावर भालाफेक केली. पाचव्या थ्रोपर्यंत, त्याचा सर्वोत्तम थ्रो केवळ 83.21 मीटर राहिला. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरच चोप्राने 89.49 मीटरचे अंतर मोजले. हा नीरज चोप्राचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो देखील आहे, कारण याआधी त्याचा सर्वोत्तम थ्रो 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाला होता, जिथे त्याने 89.45 मीटर अंतरावर भाला फेकला होता.






डायमंड लीगमध्ये काय घडलं?


डायमंड लीगबद्दल सांगायचे तर डायमंड लीग वर्षातून चार ठिकाणी आयोजित केली जाते. या कार्यक्रमांचे आयोजन दोहा, पॅरिस, लॉसने आणि शेवटी झुरिच येथे केले जाते. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक पटकावला. पण 2024 च्या ऑलिम्पिकपूर्वी त्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये फिटनेसच्या कारणास्तव भाग घेतला नव्हता. नीरज चोप्राला लुसानेमध्ये दुसरे स्थान मिळवून पुन्हा 7 गुण मिळाले आहेत. आता नीरज चोप्राकडे एकूण 14 गुण आहेत आणि एकूण गुणांच्या बाबतीत तो ज्युलियन वेबरसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसन पीटर्स 21 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर याकुब वालेश 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ज्युलियन वेबर आणि नीरज चोप्रा 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.


अंतिम सामना कधी होणार?


डायमंड लीगमध्ये चौथी फेरी बाकी आहे, जी 5 सप्टेंबर रोजी झुरिचमध्ये होणार आहे. झुरिच फेरीनंतर गुणांच्या आधारे टॉप-6 मध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये अंतिम सामना होईल. डायमंड लीगचा अंतिम सामना 13-14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये खेळवला जाईल. यापैकी एका तारखेला भालाफेकचा अंतिम सामनाही खेळवला जाईल.


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निरजला रौप्यपदक-


लॉसने डायमंड लीग 2024 च्या दोन आठवड्याआधी नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा झेंडा फडकावला होता. नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. 


संबंधित बातमी:


इशान किशनपासून श्रेयस अय्यरपर्यंत...; टीम इंडियाचे खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार!