नवी मुंबई : क्रिकेटच्या मैदानात नवी मुंबईमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. नवी मुंबईतील 14 वर्षाच्या तनिष्क गवतेने 1045 धावा ठोकल्या. तनिष्कने दोन दिवसांमध्ये ही धावसंख्या उभारली.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील यशवंतराव चव्हाण इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मैदानात भरलेल्या टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये तनिष्कने ही खेळी केली, अशी माहिती त्याच्या प्रशिक्षकांनी दिली.
तनिष्क अशा मैदानावर खेळत होता, ज्याची लेग साईडची सीमा रेषा 60 ते 65 यार्ड आहे. तर ऑफ साईडची 50 यार्ड आहे. तनिष्कच्या या खेळीला 149 चौकार आणि 67 षटकारांचा साज होता.
दरम्यान, यापूर्वीही मुंबईतील स्थानिक टूर्नामेंटमध्ये युवा क्रिकेटर प्रणव धनावडेने 1 हजार धावांचा आकडा पार केला होता, जो एक विश्वविक्रम आहे. प्रणवने वयाच्या 16 व्या वर्षी 323 चेंडूत 1009 धावांची खेळी केली होती. ज्यामध्ये 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता.