रांची : झारखंडमधील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूचा स्टेडियमवर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रांचीमधील जयपाल सिंग स्टेडियमवर झालेल्या अपघातात 25 वर्षीय विशाल कुमार वर्माला प्राण गमवावे लागले.

झारखंड राज्य कुस्ती असोसिएशनचं ऑफिस असलेली इमारत पावसामुळे धोकादायक झाली होती. या इमारतीतील इनडोअर स्टेडिअममध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. पाण्याच्या पंपाच्या मदतीने विशाल स्टेडियममध्ये साचलेलं पाणी उपसत होता. मात्र शॉर्ट सर्किटमुळे विशालला विजेचा जोरदार धक्का बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इमारतीतील काही व्यक्तींनी त्याला बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

झारखंड राज्य कुस्ती असोसिएशनचे विशालच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली आहे. तर त्याच्या चार बहिणींपैकी एकीला नोकरी लागेपर्यंत दरमहा दहा हजार रुपये वर्मा कुटुंबाला देण्यात येतील.

झारखंड बिजली वितरण निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणी हात झटकले आहेत. विजेच्या जोडणीत कोणताही दोष नसून इमारतीच्या अंतर्गत वायरिंगमध्ये लूज कनेक्शन असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.