National Games 2023 : प्रियांका वानखेडेच्या दुहेरी गोलच्या बळावर महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात कर्नाटकवर 3-1 असा शानदार विजय मिळवला. पण महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. 


अखेरच्या साखळी सामन्यात पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. मग दुसऱ्या सत्रात २७व्या मिनिटाला प्रियांकाने महाराष्ट्राचा पहिला गोल साकारला. पण पुढच्याच मिनिटाला कर्नाटकच्या निशा पी सी हिने (२८व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत मध्यंतराला १-१ अशी बरोबरी साधली. मग तिसऱ्या सत्रातही दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात मात्र महाराष्ट्राने आव्हान टिकवण्यासाठी आक्रमक खेळ केला. ५३व्या मिनिटाला प्रियांकाने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत महाराष्ट्राची आघाडी २-१ अशी वाढवली. मग दोन मिनिटांनी लालरिंडिकीने (५५व्या मिनिटाला) मैदानी गोल करीत महाराष्ट्राच्या खात्यावर तिसरा गोल जमा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या भावना खाडेला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ब-गटातून झारखंड (१० गुण) आणि पंजाब (७ गुण) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. महाराष्ट्रानेही ७ गुण कमावले. पण गोलफरकामध्ये पंजाबने आगेकूच केली.


ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करणे, हेच माझे मुख्य ध्येय- कोमल
 
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे, हेच प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. हे ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची आणि त्याग करण्याची माझी मानसिक तयारी आहे. हे ध्येय नक्की साकार होईल, असे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती महाराष्ट्राची धावपटू कोमल जगदाळेने सांगितले. कोमलचे तीन हजार मीटर स्टीपलचेसमधील सुवर्णपदक फक्त दोन सेकंदांच्या फरकाने हुकले. कोमलने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर दोन डझनापेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही तिला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र तब्येत बरी नव्हती. त्यामुळे तिला क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करता आली नाही. “मी जर शंभर टक्के तंदुरुस्त असते तर सुवर्णपदक जिंकले असते असे सांगून कोमल म्हणाली, "शेवटपर्यंत मी सुवर्णपदक विजेत्या प्रीती लांबा हिला जिद्दीने लढत दिली. मात्र काही वेळेला आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. अर्थात मला अजून पुष्कळ करिअर करायचे आहे," असे कोमल म्हणाली. 


ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नऊ मिनिटे, २३ सेकंद ही पात्रता वेळ आहे. १० मिनिटे १७ सेकंद ही माझी आजपर्यंतची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या अकादमीत मी सराव करीत असून आता ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्यासाठीच नियोजनबद्ध सराव करीत आहे. पंढरपूरजवळील आडीव या खेडेगावात राहणाऱ्या कोमल ही सुरुवातीला स्टीपलचेसबरोबरच १५०० मीटर्स धावण्याचे शर्यतीतही भाग घेत असे. या क्रीडा प्रकारात तिने २०१२ मध्ये टर्की येथे झालेल्या कनिष्ठ गटाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अनुभवाबाबत कोमल म्हणाली, "माझी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. विमान प्रवासापासून सर्वच गोष्टी मला नवख्या होत्या त्यामुळे स्पर्धेच्या वेळी थोडेसे दडपण आले होते या स्पर्धेत स्पर्धेतील अनेक नामवंत खेळाडू सहभागी झाल्या होत्या. मी पदक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला मात्र मला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अर्थात तेथील अनुभव मला पुढच्या करिअरसाठी खूपच उपयोगी पडला आहे. इटलीमध्ये सन २०१९ झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. युरोपियन खेळाडूंचे कौशल्य कसे असते हे मला अगदी जवळून पाहता आले." कोमल ही मध्य रेल्वेमध्ये नोकरी करीत असून खेळाडू म्हणून तिला तेथे चांगले सहकार्य मिळत आहे. कोमलचे वडील शेतकरी असून तिला दोन भाऊ व एक लहान बहीण आहे. तिची धाकटी बहीण पल्लवीदेखील ॲथलेटिक्समध्ये करिअर करीत आहे.


नेमबाजी - रुचिरा, साक्षी अंतिम फेरी गाठण्यात अपयशी
 
रुचिरा विणेरकर आणि साक्षी सूर्यवंशी या महाराष्ट्राच्या दोन नेमबाज चार गुणांच्या फरकाने महिला १० मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरले. रुचिराने पाच मालिकांमध्ये अनुक्रमे ९६, ९१, ९३, ९७, ९६, ९५ असे एकूण ५६८ गुण मिळवले. साक्षीने ९१, ९४, ९६, ९६, ९५ असे एकूण ५६८ गुण प्राप्त केले. अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या आठ जणींपैकी सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या नेमबाजांनी प्रत्येकी ५७२ गुण मिळवले होते.