मुंबई : इंग्लंडमध्ये 2002 साली झालेल्या नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने एक ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयाचा खरा शिल्पकार होता तो मोहम्मद कैफ. पण त्याच सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने आपल्या बस ड्रायव्हर म्हणून हिणवल्याचा गौप्यस्फोट मोहम्मद कैफने केला आहे.


लॉर्डसवरच्या त्या फायनलमध्ये इंग्लंडनं दिलेल्या ३२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ १४६ धावांतच गारद झाला होता. पण त्यानंतर मोहम्मद कैफ आणि युवराजसिंगनं अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.

त्या फायनलमध्ये इंग्लिश खेळाडूंनी तुम्हाला उद्देशून शेरेबाजी केली होती?, असा प्रश्न एका चाहत्यानं कैफला ट्विटरवर विचारला होता. त्यावर कैफनं होकारार्थी उत्तर देऊन, नासिर हुसेननं आपल्याला बस ड्रायव्हर म्हणून हिणवल्याचा गौप्यस्फोट केला आहे.


नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यातील या विजयाची नोंद भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 326 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं.

भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा भारतीय संघ 146 धावांवरच तंबूत परतला होता. त्याचवेळी युवराज आणि कैफने 121 धावांची अभेद्य भागीदार करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. यावेळी कैफ 87 धावांची खेळी करत भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

या शानदार विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्डसवरील गॅलरीतच आपली जर्सी काढून गरागरा फिरवत आपला आनंद व्यक्त केला होता. त्याने साजरा केलेला हा जल्लोष एक संस्मरणीय आठवण ठरली.