नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात एक तास चर्चा झाली. या बैठकीत राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर चर्चा झाली असावी, असा अंदाज लावला जात आहे.

अमित शाहांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरा ही चर्चा झाली. एवढंच नव्हे, तर बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे हे एकाच गाडीतून अमित शाहांच्या घरामधून बाहेर पडले. या बैठकीला आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.

या बैठकीत राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर चर्चा झाली असेल का, असे तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या या घडामोडींनंतर नारायण राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? हे पाहणं महत्वाचं आहे.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी फडणवीस दिल्लीत गेले होते. त्याचवेळी राणेही दिल्लीत उपस्थित होते.

नारायण राणेंचं भाजपमध्ये पुनर्वसन होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले होते. राणेंचा आऊटस्पोकन स्वभाव अडसर ठरण्यापेक्षा त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा आहे. अशा व्यक्ती  पक्षाची संपत्ती असतात, असंही फडणवीसांनी सांगितलं होतं.