मुंबई : सिंघम चित्रपटातील गाजलेला व्हिलन, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजप खासदाराला कोर्टात खेचलं आहे. प्रकाश राज यांनी खा. प्रताप सिन्हांवर मानहानीचा खटला दाखल केला असून हा दावा केवळ एक रुपयाचा आहे.


आपली बदनामी केल्याचा आरोप करत प्रकाश राज यांनी भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. विशेष म्हणजे नुकसानभरपाई म्हणून प्रकाश राज यांनी केवळ एका रुपयाची मागणी केली आहे. कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती प्रकाश राज यांचे वकील एम. महादेव स्वामी यांनी दिली.

3 मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. प्रकाश सिन्हांनी ऑक्टोबर 2017 मध्ये सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्याशी संबंधित काही पोस्ट लिहिल्या होत्या. या पोस्ट अपमानकारक असल्याचं सांगत प्रकाश राज यांनी नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं.

खासदार सिन्हांनी नोटीसला काहीच उत्तर न दिल्यामुळे नाईलाजास्तव प्रकाश यांना कोर्टाची पायरी चढावी लागत आहे, असं त्यांचे वकील एम. महादेव स्वामी यांनी म्हटलं आहे.

प्रकाश राज यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्यावर टीका झाली होती.