मुंबई : 'माझ्या पत्नीची इच्छा आहे की, विश्वचषक संघात माझा समावेश असावा आणि मी विश्वचषक खेळावा.' अशी प्रतिक्रिया भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा विकेटकीपर रिद्धीमान साहानं दिली आहे. एका म्युझिक लाँचिंगवेळी तो बोलत होता.

'मी विश्वचषकात खेळावं असं तिला नेहमी वाटतं. मी माझ्या परीनं प्रयत्नही करतो आहे पण निर्णय निवड समितीच्या हातात आहे.' असंही साहा यावेळी म्हणाला.

'आपण सर्व फॉर्मेटमध्ये खेळावं असं प्रत्येक खेळाडूला वाटत असतं. पण निर्णय निवड समितीवर अवलंबून असतो. माझ्या कामगिरीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी मी कायम तयारी करत असतो.' असंही साहा म्हणाला.

'भारताची बेंच स्ट्रेंथ बरीच मजबूत आहे. सध्या संघ 2019च्या विश्वचषकाची तयारी करत आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंना रोटेशन पॉलिसीनुसार संधी देण्यात येत आहे.' असं साहा म्हणाला.

साहानं भारतासाठी 28 कसोटी सामने खेळले आहेत. पण त्याला वनडे सामन्यात फार संधी मिळालेली नाही. कारण की, महेंद्रसिंह धोनी वयाच्या 36व्या वर्षीही संघात आहे आणि तो चांगली कामगिरीही करतो आहे.

साहा आतापर्यंत नऊ वनडे सामने खेळला असून त्यानं 13.66च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याला पाच डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये 16 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.