चेन्नई : टीम इंडियाचा कसोटी फलंदाज मुरली विजयला तामिळनाडूच्या वन डे संघातून बाहेर करण्यात आलं आहे. त्यामुळे विजय हजारे टूर्नामेंटच्या उर्वरित वन डे सामन्यांमध्ये त्याला खेळता येणार नाही.


तामिळनाडू विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यासाठी मुरली विजय वेळेत पोहोचला नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई म्हणून टूर्नामेंटच्या उर्वरित सामन्यांसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

मुरली विजयच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही, असंही कारण दुसरीकडे सांगितलं जात आहे. गुरुवारी सामना सुरु होण्यापूर्वी मुरली विजयने तामिळनाडू संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांना दुखापतीबद्दल माहिती दिली होती, असं तामिळनाडू क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

दुखापतग्रस्त अभिनव मुकुंदशिवायच संघ मैदानात उतरणार होता, त्यातच मुरली विजय नसल्यामुळे तामिळनाडूच्या अडचणी आणखी वाढल्या. नंतर गंगा श्रीधरला कौशिक गांधीसोबत सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

उशिरा पोहोचल्यामुळे तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने त्याला संघातूनच बाहेर केलं. या गोष्टीमुळे मुरली विजयही हैराण आहे. त्यामुळे तो लवकरच बोर्डाशी चर्चा करुन गैरसमज दूर करणार असल्याचं त्याच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

33 वर्षीय मुरली विजयने गुजरातविरुद्ध 11, तर गोव्याविरुद्ध 51 धावांची खेळी केली होती. प्रदोष रंजन पॉलचा मुरली विजयच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे.

'इएसपीएनक्रिकइन्फो'च्या वृत्तानुसार, बोर्ड विजयच्या या वागणुकीवर अगोदरपासूनच नाराज आहे. त्यामुळेच त्याचा रणजी संघातही समावेश करण्याच्या विरोधात काही अधिकारी होते.