मुनाफ पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2018 12:14 PM (IST)
भारताचा 2011 सालचा वन डे विश्वचषकातला विजय हा मुनाफच्या कारकीर्दीतला सर्वोच्च क्षण ठरला. भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.
मुंबई : भारताच्या 2011 सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आणि मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेलनं क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मुनाफने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आजवरच्या कारकीर्दीत मुनाफनं 13 कसोटी, 70 वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या कालावधीत त्यानं कसोटीत 35, वन डेत 86 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मध्यंतरीच्या काळात मुनाफ पटेल आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघाकडूनही खेळला होता. फिटनेसच्या कारणांमुळे मुनाफ आपलं संघातील आपल्या स्थानात सातत्य राखू शकला नाही. वयाच्या पस्तीशीत प्रवेश केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकेन याची आशा आता संपली आहे, या कारणासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचं मुनाफने स्पष्ट केलं आहे. भारताचा 2011 सालचा वन डे विश्वचषकातला विजय हा मुनाफच्या कारकीर्दीतला सर्वोच्च क्षण ठरला. भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.