मुंबई : उद्यापासून नेरूळ आणि उरणला जोडणारा नविन रेल्वे मार्ग सुरू होत आहे. नेरूळ ते खारकोपर आणि सीबीडी ते खारकोपर या दोन मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. दिवसभरात लोकलच्या 40 फेऱ्या होणार असून सकाळ आणि संध्याकाळ या फेऱ्यांचं प्रमाण अधिक असणार आहे.


पुढे हीच मार्गिका उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आज रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक नव्या कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.


यासोबतच वसई रोड-दिवा-पनवेल-पेण या मार्गावर आता डेमुऐवजी मेमु सर्व्हिस चालवली जाणार आहे. याचा अर्थ दिवा ते पेण या मार्गावर आधी जिथे डिझेलवर धावणारी गाडी होती तिथे आता विजेवर चालणारी गाडी धावेल. पनवेल ते पेण या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्याचेही आज लोकार्पण होईल आणि त्यामुळेच आता मेमु गाडी या मार्गावर चालवली जाणार आहे.


याशिवाय परळ स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म तसेच शिवडी, मुंब्रा, भांडूप, परळ, कळवा आणि घाटकोपर स्थानकांवर 6 पादचारी पूल, उपनगरीय स्थानकांच्या सर्व 273 प्लॅटफॉमची उंची 900 मिमीपर्यंत वाढविणे, 23 स्थानकांत 41 एस्केलेटर, 6 स्थानकांत 10 लिफ्ट, 6 स्थानकांत नवीन शौचालय, 77 स्थानकांत 318 नवीन एटीव्हीएम, 10 स्थानकांत आयपी आधारित उपनगरीय ट्रेन इंडिकेटर, 6 स्थानकांत 206 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, भिवंडी रोड आणि नावडे रोड येथे 2 नवीन बुकिंग कार्यालये आणि सानपाडा ईएमयू कारशेड येथे एक मेगावाट सौर संयंत्र यांचे लोकार्पण आणि उंबरमाली व थानसीत येथे नवीन उपनगरीय स्थानकांची पायाभरणी या सर्व कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.