मुंबई : रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा तसेच देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


हार्बरवर शनिवारी मध्यरात्री कुर्ला ते वाशीदरम्यान अप व डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. तर पश्चिम रेल्वेवर दर रविवारी असणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर आज ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्ग मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामुळे ठाणे येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत डाऊन धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद लोकल फेऱ्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांत थांबतील.