मुंबई : महिला क्रिकेट विश्वचषकात उपविजेतेपद पटकावणारा भारतीय संघ आज मायदेशी परतला. त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे साडेतीनच्या सुमारास संघातील आठ खेळाडू पोहोचल्या. या आठ खेळांडूंमध्ये झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, स्मृती मानधना, दिप्ती शर्माचा समावेश आहे,

तर पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, कर्णधार मिताली राज, मोना मेश्राम, वेदा कृष्णमूर्ती, एकता बिश्त, मानसी जोशी या उर्वरित सात खेळाडू सकाळी मुंबईत परतल्या.

त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी भाजप आमदार आशिष शेलारही उपस्थित होते. त्यांनी खेळांडूंचं विमानतळावर स्वागत केलं.

दरम्यान, महिला विश्वचषकात शानदार कामगिरी करणारा भारतीय संघाचा उद्या दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

यंदा भारतीय संघांना विश्वचषकात शानदार कामगिरीत करत फायनलमध्ये धडक मारली होती. फायनलमध्ये भारताला फक्त नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

12 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाचा बीसीसीआय सन्मान करणार आहे. प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला 25 लाख रुपयांचं बक्षीस देणार आहे.