नवी दिल्ली : आगामी काळात 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व बँकेने पाच महिन्यांपूर्वीच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. विशेष म्हणजे, म्हैसूरमध्ये 200 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु झाल्याची माहिती रिझर्व बँकेच्या सूत्रांनी दिली आहे.


'हिंदुस्थान टाईम्स' आणि 'द क्विंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, रिझर्व बँकेने पाच महिन्यांपूर्वीच त्याची छपाई बंद केली. पंतप्रधान मोदींना 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 1000 रुपये मूल्याच्या तब्बल 6.3 अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या.

यानंतर सरकारने 2000 रुपयांच्या नव्या नोटांच्या माध्यमातून 7.4 ट्रिलियन मूल्याच्या 3.7 अब्ज नोटा बाजारात आणल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं. पण या नव्या नोटांमुळे रोखीने लहान व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करुन, 200 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

होशंगाबादमधील गव्हर्नमेंट प्रेस युनिटमध्ये नुकतीच 200 रुपयांच्या नव्या सॅम्पल नोटेची गुणवत्ता आणि सुरक्षतेसंदर्भातील सर्वबाबीची पडताळणी करण्यात आली. यानंतर कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी प्रिटिंग प्रेसमध्ये त्या छपाईसाठी पाठवण्यात आल्या. यात म्हैसूरमध्ये छपाई सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, नोटाबंदीनंतर रिझर्व बँकेकडून लहान नोटा व्यवहारात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण 1000 आणि 500 रुपये किमतीच्या नोटा नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात असल्याने, सरकारकडून तात्पुरत्या स्वरुपात 2000 रुपयाच्या नव्या नोटा व्यवहारात आणल्या होत्या.

आता याची छपाई बंद करण्यात आल्याने रिझर्व बँकेकडून सर्व बँकांना 500 आणि 2000 रुपयांचा कमी पुरवठा करण्यात येत आहे. 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर देण्या-घेण्याच्या व्यवहारात सुसूत्रता येईल, असं रिझर्व बँकेच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

आरबीआय लवकरच 200 रुपयांची नोट आणणार?

200 रुपयांची नोट कशी असेल? सोशल मीडियावर फोटो व्हायरल !