लोलकांसारखा मी अडकवते कानात... पाऊस येऊन उभा माझ्या शेजारी धाराधारांनी बोलत. शांतवत.

तो असा असतो, तोवर त्याचं एखादं रौद्रभीषण रूप असेल याची कल्पनाही येत नाही. माती मिसळून लाल-काळं झालेलं पुराचं पाणी, गावांमध्ये घुसलेल्या नद्या आणि उंच घरांच्या छतांवर, झाडाच्या शेंड्यावर, मंदिराच्या कळसावर आसरा घेतलेले जीव; होड्यांमधून पूर ओलांडू पाहणारी माणसं, मुलांना वाचवू पाहणाऱ्या आया... ही या रम्य दृश्याची दुसरी बाजू असते.
पुराशी निगडित लोककथा, पुराकथा आठवू लागतात. चीनमध्ये प्राचीन काळी सलग बावीस वर्षं प्रचंड पाऊस कोसळून पीतनदीला कल्पनातीत पूर आल्याची एक कथा आहे. गावं जलमय झाली, पिकं वाहून गेली, माणसांना न घरंदारं राहिली ना अन्नपाणी. पाण्यातून मोठाल्या मगरी आल्या, त्या माणसांना अन्न बनवू लागल्या. उंच डोंगरांवर, जंगलाकडे जे धावले; ते पावसाने सैरावैरा झालेल्या, क्रूर तरीही भयभीत अक्राळविक्राळ प्राण्यांच्या तोंडचा घास बनले. माणसांची संख्या वेगानं कमी होऊ लागली. य्यो नामक राजाची चिंता वाढतच गेली; अखेर त्यानं क्वूला बोलावून घेतलं. उपाय शोधून पुरावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी राजसभेनं क्वूवर सोपवली.
क्वूने मोठा बांध बनवण्याचं ठरवलं. अख्खं राज्य पुराच्या पाण्यानं भरलेलं असताना बांधासाठी दगड-माती आणायची कुठून? मग एका दैवी मगरीनं त्याला स्वर्गातून दैवी माती आणण्याचा सल्ला दिला. ही माती क्षणार्धात घट्ट होत जाते आणि तिच्यापासून पहाडांची रांग बनवली गेली, तर पुराचा धोका कायमचा टळेल, असं तिनं सांगितलं. स्वर्गाच्या शोधत क्वू पश्चिमेकडे निघाला. वाटेत अगणित संकटं आली, असंख्य अडथळे आले; ते पार करून तो अखेर स्वर्गातल्या खुनलुन पर्वतावर पोहोचला. स्वर्गसम्राटाकडे त्यानं दिव्य मातीची मागणी केली; पुरामुळे आलेल्या संकटातून माणसांचे प्राण वाचवण्याच्या चांगल्या हेतूने आपण ही मागणी करत आहोत असंही
नम्रपणे सांगितलं. पण स्वर्गसम्राटाने स्पष्ट नकार दिला. अखेर एकेदिवशी पहारेकरी पेंगतो आहे हे पाहून क्वूने थोडीशी माती चोरली आणि स्वर्गातून आपल्या राज्याकडे धूम ठोकली. परतल्यावर त्यानं प्रथम पुराच्या पाण्यात ती चोरून आणलेली माती टाकली. पाण्याची पातळी जितकी वाढेल, तितक्या प्रमाणात ती माती वेगानं वाढू लागली. पहाडरांगा निर्माण झाल्या. पूर रोखला गेला. लोकांनी पुन्हा घरं बांधली; पुन्हा शेतीभाती सुरू केली.
चोरीची वार्ता स्वर्गसम्राटाला समजली. संतापून त्यानं सैनिकांना पाठवलं आणि दिव्य माती परत आणायला सांगितली. दिव्य माती नाहीशी होताच पुन्हा पूर आला आणि त्यानं आता कैकपट जास्त नुकसान केलं. क्वूनं सतत नऊ वर्षं प्रयत्न केले, पण त्याला नव्याने बांध बांधता आला नाही. आता राजाही त्याच्यावर वैतागला आणि त्यानं क्वूला युशान पर्वतावर तीन वर्षं कैदेत जखडून ठेवलं आणि अखेर मृत्युदंड दिला. क्वूला आपल्या मरणाची परवा नव्हती; त्याला फक्त बुडून मरणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या, वाहून जाणाऱ्या लोकांचा आक्रोश ऐकू येत होता.
राजा य्यो वृद्ध झाला, तेव्हा त्यानं श्वीनकडे राज्य कारभार सोपवला. श्वीनराजानं पुराचं संकट थोपवण्याचं काम क्वूचा मुलगा युकडे सोपवलं. युनंही आधी वडलांच्या प्रमाणेच बांध बांधण्याचा विचार केला. पण बांधामुळे पाणी अधिक खवळतं, पाऊस त्याचा संताप वाढवतो आणि बांध फोडून आलेलं पाणी कैकपट जास्त नुकसान करतं, हे युच्या ध्यानात आलं. त्यानं पाण्याला थोपवण्याऐवजी वाट काढून देऊन मोकळं करण्याचा मार्ग निवडला. एक भीमकाय ड्रॅगन समुद्राच्या अल्याड पर्वताचं रूप घेऊन अगणित वर्षं सुस्तावून निजलेला होता. त्याला जागं करून
युनं त्याच्याशी युद्ध केलं. आपल्या बलदंड हातांनी त्याचे तुकडे केले. त्यामुळे पर्वतात तीन मोठ्या खिंडी निर्माण झाल्या आणि पुराच्या पाण्याला वाटा मिळाल्या. खवळलेली पीतनदी खिंडींच्या तीन वाटांनी आपल्या प्रियकर समुद्राला जाऊन भेटली. आजही ही निसर्गरम्य स्थळं ड्रॅगनद्वार आणि त्रिमार्ग ड्रॅगनपर्वत म्हणून ओळखल्या जातात. असं सांगतात की युकडे हे काम सोपवलं गेलं तेव्हा चारच दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. पुराच्या पाण्याला वाट काढून देण्यासाठी त्याचा संघर्ष त्यानंतर तब्बल तेरा वर्षं अथक सुरू होतं. या काळात कामानिमित्ताने तो तीन वेळा आपल्या घरासमोरून गेला, पण घरात जाण्याचा, आपल्या पत्नीला भेटण्याचा मोह त्यानं टाळला. त्याचं शौर्य आणि त्याचा संयम यांची इतकी वाखाणणी झाली की, अखेर राजा श्वीन राजगादीवरून पायउतार झाला आणि युला राजा बनवण्यात आलं.
पीतनदी समुद्राला भेटून शांत झाली आणि तिचं पाणी एखाद्या मधुर प्रेमगीतासारखं झुळझुळ वाहू लागलं. त्या गाण्यांमध्ये युच्या दीर्घकाळाचा विरह सरलेल्या पत्नीची आणि नव्या घरसंसारात निश्चिंतीनं रमलेल्या प्रजेच्या प्रेमगीतांचे सूरही मिसळले.
फोटो सौजन्य : कविता महाजन