आयपीएलचा 2019 चा हंगाम होण्यापूर्वीच संघांमध्ये सोशल मीडियावर श्रेष्ठत्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यांच्या या सोशल युद्धाचा नेटीझन्सनेही आनंद लुटला.
वेस्ट इंडिजचा विस्फोटक खेळाडू केरॉन पोलार्ड हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. दोन दिवसांपूर्वी पोलार्डने पांड्या भावंडांची (हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या) भेट घेतली. त्यावेळी हार्दिकने तिघांचा एक सेल्फी काढून ट्विटरवर अपलोड केला. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत ट्विटरवरुन हार्दिकचे ट्विट रिट्विट करण्यात आले. त्यावर मुंबईने म्हटले की, याच्यापेक्षा चांगले अष्टपैलू त्रिकुट नाही.
हे ट्विट सनरायजर्स हैदराबादच्या संघाने रिट्विट केले. त्यावर हैदराबादच्या संघाने रशिद खान, मोहम्मद नबी आणि बांगलादेशच्या शकिब अल हसनचा फोटो अपलोड केला. त्यावर कॅप्शन देत मुंबई इंडियन्सला म्हटले की, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे.
ट्विटरवरचे हे युद्ध इतक्यात संपले नाही. मुंबईने त्यावर प्रत्युत्तर देत आयपीलमध्ये जिंकलेल्या तिन्ही ट्रॉफी शेअर करत हैदराबादच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यावर कॅप्शन देत म्हटले की, प्रतीक्षा संपलेली नाही.
यावर हे ट्विट वॉर संपले असे सर्वाना वाटत होते. परंतु कहानी में ट्विस्ट येणं अद्याप बाकी होतं. कारण यामध्ये चेन्नईची एंट्री झाली नव्हती. चेन्नईच्या संघाने मुंबईचे ट्विट रिट्विट करत महेंद्रसिंग धोनीचा फोटो अपलोड केला. त्यावर त्यांनी Moondru Mugam असे कॅप्शन लिहिले. मुंद्रू मुगम म्हणजे त्रिमुर्ती.