मुंबई : मुंबईत रहिवाशी आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी पाणी कपातीची शक्यता आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीत पाणी कपातीचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरा मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी पाणी कपातीच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मांडण्यासाठी होकार दिला आहे.


स्थायी समिती सदस्यांच्या विरोधाशिवाय हा प्रस्ताव पास व्हावा, यासाठी ऐनवेळी स्थायी समितीसमोर पाणीकपातीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला तलावांमध्ये 92 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. तर सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 76 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.


यावर्षी पावसाने ओढ दिल्यानं 1 ऑक्टोबरला मुंबईकडे 91 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली होती. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 11 लाख दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.


त्यामुळे कमी पाणीसाठीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सरसकट 10 टक्के पाणी कपात जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती आणि सभागृहाच्या मंजुरीनंतर ताबडतोब पाणीकपात लागू केली जाईल.


मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या महिन्यातही दक्षिण मुंबईत मोठी पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण देण्यात आले होते.