मुंबई : इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये भारतीय खेळाडूंनी पहिले स्थान पटकावले आहे. फलंदाजीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याचे पहिले स्थान कायम राखले आहे. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहलादेखील त्याचे पहिले स्थान अबाधित ठेवण्यात यश मिळाले आहे.

कोहली 899 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर, भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादित बुमराहने 840 गुण मिळवले आहेत.

विराटसह भारताच्या सलामीवीर शिखर धवनने टॉप टेन यादित प्रवेश केला आहे. शिखर आता आठव्या क्रमांकावर आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनी 20 व्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजीत बुमराहसोबत कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या दोघांनी टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. कुलदीप तिसऱ्या स्थानावर आहे, तर चहल पाचव्या क्रमांकावर आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय खेळाडू पहिल्या क्रमांकावर असले तरी, ऑल राऊंडर खेळाडूंच्या यादित अफगानिस्तानचा राशिद खान 353 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

सांघिक कामगिरीत भारतीय संघ 121 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ 126 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.