मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 13 धावांनी मात केली. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. शिवाय मुंबईने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली.


मुंबईच्या विजयात पंड्या बंधूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजीत मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यात दोघांनी मदत केली. शिवाय हार्दिकने गोलंदाजी करताना कोलकात्याच्या दोन फलंदाजांनाही माघारी धाडलं. तर कृणाल पंड्याने सामन्यातलं शेवटचं षटक टाकून विजय खेचून आणला.

सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकात्यासमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.

मुंबईचा सलामीवीर सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. तर एविन लेविसने 28 चेंडूत 43 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भक्कम सलामी दिली. त्यामुळे मुंबईला 20 षटकांत चार बाद 181 धावांची मजल मारता आली.

कोलकात्याकडून सुनील नारायण आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मात्र रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता कोलकात्याच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. दिनेश कार्तिकने नाबाद 36 आणि नितीश राणाने 31 धावा केल्या.