बुलडाणा : देशभरातील 136 शहरांमध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही परीक्षा घेण्यात आली. मात्र बुलडाण्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी एक अशी होती. मात्र हा पेपर साडे बारा ते साडे तीन वाजेपर्यंत घेण्यात आला.


बुलडाण्यातील सहकार विद्या मंदिर सेंटरवर उर्दू विषयाच्या जवळपास 250 विद्यार्थ्यांना अन्य भाषेची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही चूक लक्षात येताच या विद्यार्थ्यांना झेरॉक्स केलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. या प्रश्नपत्रिकांवर अक्षरही स्पष्ट दिसत नव्हतं, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, या प्रश्नपत्रिका झेरॉक्स करण्यात दुपारचे साडे बारा वाजले. एकीकडे देशभरातील परीक्षार्थींचा पेपर संपत होता, त्यावेळी बुलडाण्यातील उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आला, जो दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सुरु होता.