मुंबई : आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून या मोसमातली चौथ्या विजयाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात ब्रेन्डन मॅक्युलमच्या 64 आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद 48 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातनं 20 षटकांत चार बाद 176 धावांची मजल मारली होती.


मुंबईने तीन चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजयासाठीचं 177 धावांचं लक्ष्य गाठलं. मुंबईचा हा पाच सामन्यांमधल्या चौथा विजय ठरला. या विजयासह मुंबईने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.

मुंबईने गुजरातवर मिळवलेल्या विजयात महत्त्वाचा ठरला तो कर्णधार रोहित शर्माला गवसलेला सूर. पहिल्या चार सामन्यांमध्ये मिळून रोहितच्या नावावर केवळ नऊ धावा होत्या. त्याच रोहितने गुजरातविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 40 धावांची खेळी केली. त्यानं नितीश राणाच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची आणि कायरन पोलार्डच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली.

नितीश राणाने 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावांची, तर पोलार्डने 23 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 39 धावांची खेळी उभारली.