पारोळ्यातील संघर्षयात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे 12 गावातील 100 शेतकरी 100 बैलगाड्या घेऊन या यात्रेत सहभागी झाले. यावेळी अजित पवार, जयंत पाटील माजी राज्यमंत्री गुलालराव देवकर हे देखील बैलगाडीत स्वार झाले. पारोळ्यानंतर संघर्षयात्रा नंदुरबारच्या शहाद्यात पोहचणार आहे. शहाद्यात सभा संपल्यावर संघर्षयात्रा धुळ्यात मुक्कामी जाईल.
मुक्ताईनगरमध्ये खडसेंकडून विरोधकांचं स्वागत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शेतकरी कर्जमाफीसाठी निघलेली संघर्षयात्रा भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे पोहचली. यावेळी खडसेंच्या फार्म हाऊसवर अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी खडसेंची भेट घेतली. पण ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं खडसेंनी सांगितलं.
संघर्ष यात्रेनिमित्त विरोधक फडणवीस सरकारला अडचणीत आणत असतान दुसरीकडे खडसें यांच्या घरी विरोधकांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. सध्या एकनाथ खडसे भाजपमध्ये एकाकी पडले असताना या भेटची बरीच चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या संघर्ष यात्रेला बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सुरवात झाली. या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.