पुणे : रोहित शर्माच्या कर्णधारास साजेशा खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांमधला केवळ दुसरा विजय ठरला.


पुण्याच्या एमसीए स्टेडियमवरच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने दोन चेंडू आणि आठ विकेट्स राखून ते पार केलं.

कर्णधार रोहित शर्माने सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी उभारून मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने 44 आणि एविन लुईसने 47 धावांची खेळी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला.

त्याआधी, सुरेश रैनाने नाबाद 75 आणि अंबाती रायुडूने 46 धावांची खेळी करून चेन्नईला पाच बाद 169 धावांची मजल मारुन दिली होती.

सततच्या पराभवाच्या मालिकेनंतर मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डऐवजी जेपी ड्युमिनीला संधी दिली होती.