फ़ैसला जो कुछ भी हो, मंज़ूर होना चाहिए
जंग हो या इश्क़ हो, भरपूर होना चाहिए
एकदाच तकरार तकरार मध्ये बुढा खालू बब्बनला 'नाडे का ढिला' असा खिताब देतो. बब्बन उसासून म्हणतो, "वा खालू! आपका इष्क इश्क और हमारा इश्क सेक्स?" शूटिंग संपल्यावर नसीर म्हणाला होता, "अर्शद सोबत अभिनय करणं म्हणजे तोलामोलाच्या प्रतिस्पर्ध्यासोबत टेनिस मॅच खेळण्यासारखं असत.
'सेहर' मध्ये अर्शदचा अजय आणि सुशांतचा गजराज चित्रपटात पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतात. ते लंबेचवडे डायलॉग बोलत बसत नाहीत. लगेच एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला उद्युक्त होतात. तिवारीही टास्क फोर्स सोबत असतातच. अंदाधुंद गोळ्या चालतात. एक वेळ अशी येते की, गजराजच्या टोळीतले आणि टास्क फोर्समधले सगळे मारले जातात. तिवारी एका बाकाआड दडून भीतीनं थरथरत हा मृत्यूचा मंजर बघत असतात. आता दोघंच जण शिल्लक असतात. गजराज आणि जबर जखमी झालेला अजय. गजराज आपली बंदूक अजयवर रोखतो. नेहमी युद्धात पांडव जिंकायला पाहिजे, असं थोडीच असतं! अजय डोळे मिटतो. गोळी झाडल्याचा आवाज येतो. अजय डोळे उघडतो. गजराजवर कुणीतरी गोळी झाडलेली असते. प्रोफेसर तिवारी थरथरत्या हातात बंदूक घेऊन उभे असतात. अजयच्या म्लान चेहऱ्यावर हसू उमलतं. गजराजचा खात्मा बघून अजय आनंदानं डोळे मिटतो. आपल्या वडिलांमुळे परिवारावर लागलेला डाग आपण पुसला आहे, हे समाधान त्याला शेवटच्या क्षणी लाभतं.
जॉली एल एल बी चा शेवटचा सीन बघताना अंगावर काटा येत नाही असं होत नाही. 'आपल्या सुंदर शहरांना विद्रुप बनवणारी आणि फुटपाथवर झोपणारी लोक येतात तरी कुठून?' अशा ठसठसणाऱ्या प्रश्नावरून ते भाषण सुरु होत आणि 'फुटपाथ झोपण्यासाठी नसतात पण कार चालवून लोकांना चिरडण्यासाठी पण नसतात' असं समोरच्या वकिलाला (बोमन) ठासून सांगतो तिथं संपत आणि शेवटी जाता जाता बोमनला उद्देशून बोलतो, कानून की बात करता है साला. तो सीन म्हणजे अक्षरशः अभिनयाचा सोहळा होता. अर्शद काय ताकदीचा अभिनेता आहे हे दाखवून देणारा .
जॉली एल एल बी च्या दुसऱ्या भागात अर्शद वारसीला न घेता अक्षय कुमारला घेणं आपल्या स्टार सिस्टमवर झगझगीत प्रकाश टाकत. जॉली एल एल बी रिलीज झाला तेंव्हा हा सिनेमा हिट होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय, बांधीव पटकथा, अप्रतिम दिग्दर्शन आणि सौरभ शुक्ला, बोमन इराणी, अर्शद वारसी यांचा जबरी अभिनय यामुळे चित्रपट अनपेक्षितरित्या चालला. सध्याच्या प्रथेनुसार लगेच सिक्वल ची तयारी सुरु झाली. पहिला भाग हिट झाल्यामुळे प्रोड्युसर मिळण्याचा काही प्रॉब्लेम नव्हताच. पण बोर्ड वर आलेले नवीन प्रोड्युसर फॉक्स स्टार स्टुडियोने दिग्दर्शकाला ऑफर दिली, let 's make it better.
थोडक्यात मोठा स्टार घेऊ. हिट फ्रॅन्चायजी आणि मोठा स्टार हे विन विन कॉम्बिनेशन होत. पण याचा दुसरा अर्थ होता अर्शदची गच्छंती. तशी ती झाली. मनावर दगड ठेवून का होईना दिग्दर्शकाने फॉक्स स्टारची मागणी मान्य केली. वरवर पाहता यात गैर काही नाही. पण स्क्रिप्ट अर्शदला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली होती. अर्शदने डेट्स पण दिल्या होत्या. जेंव्हा जॉली एल एल बी वर कुणाचा विश्वास नव्हता तेंव्हा तो अर्शदने दाखवला. स्वतःच शंभर टक्के दिलं. माझ्या मते तरी जॉली एल एल बी च्या दुसऱ्या भागात पण अर्शद आणि अर्शदच हवा होता. अर्शद पण या सगळ्या प्रकरणामुळे दुखावलाच. पण तो थोडीच सुपरस्टार आहे की लोक त्याला किंमत देतील? अक्षय स्वतः चांगला अभिनेता आहेच आणि तो जॉलीची भूमिका चांगली केलीच यात संशय नाही पण या सगळ्यात एका चांगल्या अभिनेत्यावर अन्याय झाला. आपली इंडस्ट्री जर त्याला सर्किटच्याच भूमिकेत बांधून ठेवणार असेल तर नुकसान इंडस्ट्रीचंच होणार आहे.
'सेहर' हा चित्रपट म्हणजे अर्शदच्या कारकिर्दीमधला बहुतेक सगळ्यात महत्वाचा मैलाचा दगड. अगदी मुन्नाभाई सिरीजपेक्षा पण महत्वाचा. उत्तर प्रदेश म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर जे जे येतं, ते ते सगळं 'सेहर' मध्ये दिसतं. अराजक, अंदाधुंदी, स्वस्त झालेली हत्यारं, मानवी आयुष्यं आणि बरंच काही. प्रामाणिक अधिकाऱ्यानं भ्रष्ट व्यवस्थेला अंगावर घेणं हा बॉलिवुडचा आवडता विषय. 'जंजीर', 'गंगाजल', 'अर्धसत्य', 'शूल', 'खाकी' किती उदाहरणं द्यावीत! पण या यादीतही 'सेहर'चं एक वेगळं स्थान आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपट बराचसा सत्य घटनेवर आधारित आहे.
प्रामाणिक पोलीस अधिकारी असणाऱ्या अजय कुमारच्या रोलमध्ये त्याने आपलं सर्वस्व दिलं आहे. हा चित्रपट येईपर्यंत अर्शदची 'सर्किट' इमेज प्रस्थापित झाली होती. ही गंभीर भूमिका करण्यास हा अभिनेता योग्य आहे, का अशी शंका अनेकांना वाटत होती. पण आपल्या अभिनयानं अर्शदनं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानं चित्रपटात आदर्श अंडरप्ले कसा असावा याचं उदाहरण घालून दिलं आहे. धीरगंभीर, क्वचितच हसणारा, न्यायाची चाड असणारा, कमी पण मुद्देसूद बोलणारा आणि डोक्यात आगडोंब उसळलेला पोलीस ऑफिसर रंगवण्यासाठी अर्शदशिवाय योग्य माणूस दुसरा कुठलाच नव्हता, असं सिनेमा बघितल्यावर सतत वाटत राहतं.
'सेहर' फारसा चालला नाही. ज्या दिवशी तो प्रदर्शित झाला, त्याच दिवशी प्रचंड पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली होती. पण तसं झालं नसतं तरी चित्रपट चालला असता का? बहुतेक नाही. अर्शद हा प्रेक्षकांच्या समझमध्ये न आलेला दुर्दैवी अभिनेता आहे .
अमिताभ बच्चन या महानायकाचं भारतीय चित्रपटसृष्टीतलं योगदान सर्वश्रुत आहे. पण त्याचं एक योगदान असं आहे जे तुलनेने दुर्लक्षित आहे. बच्चन जेंव्हा निर्माता बनला होता तेंव्हा त्याने अर्शदला 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून पहिला ब्रेक दिला होता. मी आणि माझ्यासारखे अर्शदचे शेकडो चाहते यासाठी बच्चनला डोक्याला लावायच्या तेलाच्या आणि च्यवनप्राशच्या जाहिराती, 'सूर्यवंशम' किंवा 'मेजरसाब' सारखे गुन्हे माफ करायला पण तयार आहोत.
अर्शदची बायको मारिया एकदा त्यांच्या मुलाचा अभ्यास घेत होती. भौतिकशास्त्राचा अभ्यास चालू असावा बहुतेक. तिने आपल्या मुलाला विचारलं, "सर्किट म्हणजे काय?" तर त्या लहान मुलाने तिथेच बसलेल्या अर्शदकडे बोट दाखवलं. अर्शद जोरात हसला. आपल्या लहान मुलाला आपण केलेल्या एका पात्राचं नाव माहित आहे याचा आनंद झाला असणार. पण आपल्या पोराला आपला अजय कुमार माहित नाही, जॉली मिश्रा माहित नाही, बब्बन माहित नाही हे त्याला डाचल असणारच.