भिवंडी : गॅलरीतून डोकावताना तोल गेला आणि तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात ही घटना घडली असून, ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे.
भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरातील अब्दुल रफिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सईद अहमद मोमीन आपल्या परिवारासह राहत असून इमारतीच्या गॅलरीत लोखंडी जाळी बसवण्यात आली होती. बाहेरुन किराणा घेण्यासाठी या लोखंडी जाळीला थोडा गॅप ठेवण्यात आला होता.
शनिवारी दुपारच्या सुमारास सईद अहमद मोमीन यांची मुलगी तकदीस सईद अहमद मोमिन वय वर्ष 8 ही गॅलरीमध्ये स्टूल लावून लोखंडी जाळीतून बाहेर डोकावत होती. तेवढ्यात तिचा तोल जाऊन तकदीस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. त्यानंतर स्थानिकांनी तिला प्राथमिक उपचाराकरता भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तकदीसची परिस्थिती गंभीर असल्याने तिला ठाण्यातील टायटन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता हलवण्यात आले होते. मृत्यूशी झुंज देत तकदीसने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून निजामपुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.