मुंबई : युवा खेळाडू करुण नायरची वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड न केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संघात त्याचा समावेश का केला नाही याबाबतची माहिती त्याला अगोदरच कळवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय.


दुसरीकडे संघ व्यवस्थापनाकडून माझ्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही, अशी प्रतिक्रिया करुण नायरने दिली होती. निवडीपूर्वी तो क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. “आमच्यात (नायर, निवडकर्ते आणि संघव्यवस्थापन) कोणतीही बातचीत झालेली नाही. हे खुप अवघड आहे, मी कुणाला काही विचारलंही नाही आणि मला कुणी काही सांगितलंही नाही,” असं तो म्हणाला.

यापूर्वी करुण नायरची इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती. पण त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही, ज्यानंतर निवडकर्त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.

“मी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडल्यानंतर लगेचच स्वतः करुण नायरशी बातचीत केली आणि त्याला पुनरागमन करण्याची पद्धत सांगितली. निवड समिती संवाद प्रक्रियेमध्ये अत्यंत स्पष्ट आहे,” असं त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं.

भारतासाठी त्रिशतक ठोकणारा दुसरा खेळाडू संघात असूनही अंतिम अकरामध्ये खेळण्यासाठी प्रतीक्षेत आहे. यावेळी तर त्याची भारतीय संघातच निवड करण्यात आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम दोन कसोटी सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आला तेव्हा युवा खेळाडू हनुमा विहारीला पदार्पणाची संधी देण्यात आली, ज्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

करुणसाठी पुनरागमन करण्याची पद्धत काय असेल, असाही प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला. ''त्याला रणजी ट्रॉफीमध्ये धावा काढणं जारी ठेवावं लागेल आणि भारतीय अ संघाच्या ज्या मालिका होतील, त्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचा कसोटी क्रिकेटसाठी भविष्यातील प्लॅनमध्ये समावेश आहे. त्याला सध्या मायदेशातल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिलाय,'' असं प्रसाद यांनी सांगितलं.