मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रत्येक महत्त्वापूर्ण विजयानंतर स्टम्प घरी नेण्याची सवय होती. कर्णधारपदाची धुरा धोनीने कोहलीच्या खांद्यावर सुपूर्द केली असली, तरी परंपरा कायम राखण्याचा त्याचा प्रयास आहे. याच भावनेतून धोनीने कटक वनडे सामन्यातील विजयानंतर खास गिफ्ट दिलं.
इंग्लंडविरोधातील कटकमधील वनडे सामना जिंकताच टीम इंडियाने मालिका खिशात घातल्याचं निश्चित झालं. हा विजय म्हणजे कोहलीने वन डेचं कर्णधारपद सांभाळल्यानंतरचा पहिलाच मालिका विजय. ही विक्टरी कोहलीसाठी आयुष्यभर संस्मरणीय व्हावी, म्हणून धोनीने कोहलीला बॉल भेट दिला.
सध्या सामन्यांमध्ये वापरले जाणारे महागडे एलईडी स्टम्प्स घरी नेण्याची परवानगी क्रिकेटपटूंना नाही. त्यामुळे सामन्यात वापरलेला चेंडू देऊन धोनीने कोहलीचं कौतुक केलं. अनपेक्षित गिफ्टमुळे भारावलेल्या कोहलीने हसऱ्या चेहऱ्याने ही भेट स्वीकारली. नंतर कॅप्टन कूल अशी ख्याती असलेल्या धोनीचा ऑटोग्राफही कोहलीने त्या बॉलवर घेतला.
'हल्लीच्या सामन्यांमध्ये स्टम्प अत्यंत महाग झाल्याने आम्हाला ते घरी नेण्याची परवानगी नाही. त्यामुळे एमएस (धोनी)ने मला सामन्यात वापरलेला बॉल गिफ्ट केला. हा तुझी पहिलीच वनडे मालिका आहे, आणि ती तुझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असं धोनी तो बॉल देताना म्हणाला. ते माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. मी त्याच्याकडून त्या बॉलवर स्वाक्षरीपण घेतली.' अशी माहिती कोलकाता वन डे नंतर
कोहलीने 'बीसीसीआय'शी बोलताना दिली.
कोलकाता वन डेमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने 5 धावांनी भारतावर विजय मिळवला आहे. मात्र टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली.
इंग्लंडनं 50 षटकांत 8 बाद 321 धावा करुन भारताला विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केदार जाधव पुन्हा एकदा हिरो ठरला.