पिंपरी-चिंचवड: शिवसेना, भाजपा आणि मनसे यांना मुंबईशिवाय इतर शहराचं काही घेणं देणं नसल्याची टीका अजित पवार यांनी केली. 'कृष्णकुंज मधील तो नेता कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. मातोश्रीचा जीव तर फक्त मुंबई मध्येच अडकला आहे, भाजपचं लक्षही मुंबईवरच आहे.' असं म्हण अजित पवारांनी शिवसेना-भाजपवर हल्लाबोल केला.
पिंपरीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. निवडणुकांपूर्वी संघाकडून अशी विधानं जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.
'संघाचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे.'
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी संघावरही सडकून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी आरक्षण हटवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार टीका केली. 'संघाचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे.' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी मनमोहन वैद्यांवर टीकास्त्र डागलं.
'शरद पवारांचं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं'
याचवेळी बोलताना अजित पवारांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. 'घार आकाशात उडत असली, तरी तिचं लक्ष जमिनीवरील पिल्लांकडे असतं. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं. भाजपाची मात्र घार कुठं आणि पिल्लं कुठं याचा मेळच लागत नाही.' अशी उपरोधिक टीका करत अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांकडे लक्ष न देणारा पक्ष नसल्याचं नमूद केलं.