राजकोट: न्यूझीलंडने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करुन मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
न्यूझीलंडने 20 षटकात तब्बल 196 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताला हे आव्हान पेलवलं नाही, भारताला 20 षटकात 7बाद 156 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताचा 40 धावांनी पराभव झाला.
या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी स्टाईलिश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने महेंद्रसिंह धोनीला लक्ष्य केलं.
धोनीची कामगिरी पाहता टी ट्वेण्टीमध्ये धोनीऐवजी नवा पर्याय पाहायला हवा, असं व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला.
‘धोनी खूपच हळू खेळला’
“या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सुरुवातीपासून भारताची धावगती वाढती ठेवली. मात्र त्या तुलनेत धोनीने वेगवान धावा केल्या नाहीत. कोहलीच्या साथीला धोनी आला त्यावेळी भारताची अवस्था 9.1 षटकात 67/4 अशी होती.
त्यावेळी कोहली चौकार ठोकत होता, मात्र धोनीने सेट होण्यासाठी बराच वेळ घेतला. धोनीला 4 धावा करण्यासाठी 5 चेंडू लागले, मग 8 धावांसाठी 9 चेंडू आणि 16 धावांसाठी 18 चेंडू खेळावे लागले.
म्हणजेच धोनीने तीन षटकात केवळ 16 धावाच केल्याने, आवश्यक धावांचं अंतर वाढत गेलं. जर धोनीने या 18 चेंडूत किमान 28 ते 30 धावा केल्या असत्या, तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असं”, असं लक्ष्मणचं मत आहे.
‘धोनीचा स्ट्राईक रेट योग्य नव्हता’
“धोनी टी ट्वेण्टीमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो. त्याला फटकेबाजी करण्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो. पण परवाच्या सामन्यात कोहलीने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ते पाहता धोनीने त्याला स्ट्राईक देणं आवश्यक होतं. त्यावेळी कोहलीचा स्ट्राईक रेट 160 होता तर धोनीचा 80 होता. ज्यावेळी एवढ्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना, धोनीचा हा स्ट्राईक रेट योग्य नव्हता.”, असं लक्ष्मण म्हणाला.
‘तरुणांना संधी द्या’
“मला अजूनही वाटतंय की आता धोनीने आता टी ट्वेण्टीमध्ये तरुणांना संधी द्यायला हवी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्याने तरुणांना विश्वास मिळेल. असं असलं तरी धोनी हा वन डे संघात हवाच”, असंही लक्ष्मणने नमूद केलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने 37 चेंडूत 49 धावा केल्या. धोनीने जेव्हा खेळाचा वेग वाढवला तेव्हा खूप वेळ झाला होता. धोनीने 19 आणि 20 व्या षटकात फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.
http://polldaddy.com/poll/9868267/
संबंधित बातम्या
पहिल्याच मॅचमध्ये 53 धावा, सिराजबद्दल बुमरा म्हणतो...
स्टम्प किंगची स्टम्पिंग करणं अशक्य, धोनीची जबरदस्त स्ट्रेचिंग
दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची भारतावर 40 धावांनी मात