रियाद : भ्रष्टाचारविरोधी 'निर्णायक' कारवाईत सौदी अरबच्या प्रमुख उद्योजकांसह 11 राजपुत्र आणि डझनभर माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाचं गठन करुन तात्काळ अनेकांना अटक केली. त्यांच्या या कारवाईमुळे अनेक भष्ट्राचारी लोकांचे धाबे दणाणले आहेत.


या आयोगाने भ्रष्टाचाराच्या जुन्या प्रकरणांची चौकशी सुरु केली असून त्यात हे सर्वजण दोषी असल्याचं समजताच त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. जेद्दाहमध्ये २००९ला आलेल्या महापुरानंतर झालेल्या मदतकार्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. यासह इतर काही प्रकरणांमध्ये हे अटकसत्र सुरु आहे.

यावेळी फक्त माजी मंत्रीच नव्हे तर चार विद्यमान मंत्र्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कारवाईबाबत सध्या सौदीमध्ये बरीच चर्चा सुरु आहे.

दरम्यान, अनेकांनी राजपूत्र सलमान यांच्या या कारवाईला समर्थन दर्शवलं आहे. भष्ट्राचार आणि दहशतवादाविरोधात लढणं गरजेचं असल्यानं अशा कारवाईची गरज असल्याचं अनेकांचं मत आहे.